सुशीलकुमार शिंदेंनी केला मोठा खुलासा
काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे फाईव्ह डिकेड्स इन पॉलिटिक्स नावाचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे. या आत्मचरित्रात शिंदे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोडावर काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिंदे काही काळासाठी देशाचे गृहमंत्री देखील राहिले आहेत. तसेच त्यांनी राज्यपाल म्हणूनदेखील जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी सावरकरांनी प्रयत्न केले आणि सावरकर हे विज्ञानवादी होते, असे म्हटले आहे. तसेच सावरकरांचे संकुचित विचार हे आव्हानच आहे आणि आता काँग्रेसच्या विचारसरणीत सुधारणा घडवून आण्याची गरज आहे, असेही त्यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून भाजप पुन्हा एकदा काँग्रेस आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधणार आहे.
शिंदे यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे की, माझ्या मनात सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर आहे. त्यामुळे मी 1983 ला नागपुरात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याच्या कार्यक्रमाला हजर राहिलो होतो आणि सावरकरांना पाठिंबा दिलेल्या मुद्द्यांवर मी ठाम राहिलो होतो. सावरकरांनी आपल्या काळात अस्पृश्यता आणि जातीयवाद संपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मीदेखील मागासवर्गातील असल्याने सावरकरांच्या प्रयत्नांचे मला विशेष महत्त्व वाटते, असे शिंदे यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.