अल्पवयीन आरोपींचे वय आता अठरा वरून चौदा करणार

राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटनेतही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटना कमालीच्या वाढल्या आहेत. या घटनांना आळा घालून महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान अजितदादा पवार यांनी गुन्हेगारीबाबत आज आढावा घेतला. यावेळी अजितदादा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अजितदादा म्हणाले, अल्पवयीन गुन्हेगाराची वयोमर्यादा १४ वर्षाच्या आत ठेवण्याची गरज आहे. कारण पूर्वीची मुलांची बुद्धीमत्ता आणि आजची परिस्थिती वेगळी बनली आहे. यासंदर्भात आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहोत. कारण हा विषय केंद्राशी निगडित आहे. अल्पवयीन गुन्हेगार हा १४ वर्षाच्या खालील गृहीत धरला जावा, अशा स्वरूपाची मागणी आम्ही सरकारच्यावतीने करणार आहे.
अजितदादा यांनी बारामती येथे आज वाढत्या गुन्हेगारीवर पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजितदादा म्हणाले, शालेय विद्यार्थी १४ वर्षाच्या पुढे गेले की, त्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठी केला जात आहे. या मुलांमध्ये रागावर नियंत्रण न ठेवण्याची वृत्तीदेखील वाढत आहे. यामुळे गुन्हे वाढत आहेत.
दरम्यान, ही मुले अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर गुन्हेगाराप्रमाणे कारवाई केली जात नाही. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अल्पवयीन गुन्हेगाराचे वय १४ वर्षाच्या आत असावे.



