राजकीय
काँग्रेस अध्यक्ष खरगेंची जीभ घसरली, मोदींनी शिव्यांचा डाटाच काढला

काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या असून ते वारंवार अशाच सगळ्या समाजांना शिव्या देत सुटले आहेत. कर्नाटकची जनता या शिव्यांना मतदानाद्वारे प्रत्युत्तर देईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेत्यांना दिला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दोन दिवसांपूर्वी मोदी यांना विषारी साप म्हटले होते. त्यापार्श्वभूमीवर कर्नाटकच्या हुमनाबाद येथे आयोजित सभेत मोदींनी प्रत्युत्तर दिले.
काँग्रेस आतापर्यंत मला ९१ वेळा शिव्या देऊन आपला वेळ शिव्यांच्या डिक्शनरीत घालवला. तो वेळ त्यांनी चांगले शासन देण्यात घालवला असता तर काँग्रेसची एवढी दुर्दशा झाली नसती. काँग्रेस नेत्यांनी पूर्वी चौकीदार चोर आहे, मोदी चोर आहे, सगळा ओबीसी समाज चोर आहे, अशा शिव्या दिल्या. कर्नाटकात आता त्यांनी लिंगायत समाजालाही चोर म्हटले आहे. सगळ्या समाजांना काँग्रेसने दुखावून ठेवले आहे.
कर्नाटकची जनता काँग्रेसच्या या शिवीगाळीला मतदान यंत्राद्वारे चोख प्रत्युत्तर देईल, अशा कठोर शब्दांत मोदींनी काँग्रेसच्या नेत्यांवर शरसंधान साधले.