विधानसभेच्या तोंडावर शरद पवार गटाला खुशखबर
लोकसभा निवडणुकीत मोठा गाजावाजा अन् आलिशान गाड्यांचा ताफा घेऊन महाराष्ट्रात दाखल झालेल्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाची थोड्याच दिवसांत वाताहत झाली. तेलंगणाच्या निवडणुकीत के. चंद्रशेखर राव यांची सत्ता गेली. तसेच महाराष्ट्रातील त्यांच्या पक्षाचा आलेख कमालीचा घसरला. लोकसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रातील ज्या नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला ते नेते आता विधानसभेच्या तोंडावर घरवापसी करू लागले आहेत.
आता तर या पक्षाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. केसीआर यांच्या बीआरएस पक्षाची महाराष्ट्र शाखाच ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीत पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर बीआरएसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी येत्या सहा ऑक्टोबर रोजी पुण्यात पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. भारत राष्ट्र समितीच्या पदाधिकारी आणि पवारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर ही मोठी माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बीआरएस पक्षाची महाराष्ट्र शाखाच पवार गटात विलीन होण्याची शक्यता आहे. जर असे घडले तर महाविकास आघाडीचे राजकीय बळ मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.