शिंदे यांच्या हत्येचा रचण्यात आला होता कट

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही स्वर्गीय आनंद दिघे यांच्याप्रमाणे घात करण्याचा कट आखण्यात आला होता, असा आरोप शिरसाट यांनी केला आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जात होत्या. त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे, अशी शिफारस पोलिसांनी स्वत:हून केली होती. तरी त्या फाईलवर सही करण्यात आली नाही. याचा अर्थ शिंदे यांना शहीद करण्याच्या मार्गावर उभे करणे, असा होतो. शिंदे हे सर्व डावपेच ओळखून होते. या परिस्थितीमध्येही शिंदे हे खंबीर होते. शिंदे यांच्यासोबत दिघे पॅटर्न वापरला जाणार, अशी चर्चा त्यावेळी सुरु असल्याचेही शिरसाट यांनी सांगितले.
आनंद दिघे यांची हत्या झाली होती असा आणखी एक गंभीर आरोप शिरसाठ यांनी केला. ठाण्यातील सर्वांना याची माहिती आहे. आनंद दिघे यांचा अपघात झाला होता. त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती. त्यांचा रक्तदाब आणि शुगर व्यवस्थित होती. अशावेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका कसा आला? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला.