ब्रेकिंग! तामिळनाडूत राजकीय भूकंप

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना थेट राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. घराणेशाहीच्या राजकारणाचा दबदबा असलेल्या तामिळनाडूत मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
उदयनिधी सध्या तामिळनाडू सरकारमध्ये क्रीडा मंत्री म्हणून काम पाहत आहेत. आता त्यांना प्रमोशन मिळाले असून सरकारमध्ये दोन नंबरचे पद मिळाले आहे. आज दुपारी साडेतीन वाजता उदयनिधी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
सेंथिल बालाजी यांना पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी करण्यात आले आहे. सेंथिल यांना मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला होता. डेअरी विकास विभाग सांभाळणाऱ्या एम. थंगराज सहीत अन्य तीन मंत्र्यांना कॅबिनेटमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
बालाजी यांच्या व्यतिरिक्त डॉ. गोवी चेझियान, आर.राजेंद्रन, एस. एम. नासर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. कथित नोकरी घोटाळ्यात सेंथिल बालाजी यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांनी फेब्रुवारी महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.