राजकीय
सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरु असताना ‘जय श्रीराम’च्या घोषणा

पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये आज महामार्ग उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु, हा कार्यक्रम गाजला तो खासदार सुप्रिया सुळेंच्या भाषणादरम्यान झालेल्या घोषणाबाजीने. या कार्यक्रमात सुळे बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा उपस्थितांमधून घोषणाबाजी सुरू झाली. यामध्ये जय श्रीरामसह अनेक घोषणा देण्यात आल्या.
यावेळी स्वत: गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ आणि चंद्रकांतदादा पाटील उपस्थितांना आवरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, उपस्थितांनी घोषणाबाजी काही थांबवली नाही. उलट काहीवेळ सुळे यांना आपले भाषण थांबवावे लागले.
त्या पुढे बोलताना म्हणाल्या, मी गडकरींचे आभार मानते, तेव्हड्यात उपस्थितांमधील एका व्यक्तीने मानलेच पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली. सुळे भाषणावेळी उभ्या राहिल्या त्यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली. घोषणा देणाऱ्यांना थांबवण्यासाठी खुद्द फडणवीस आणि गडकरींनीही प्रयत्न केले पण घोषणा सुरूच होत्या. घोषणा थांबल्यानंतर ज्यावेळी सुळे म्हणाल्या की, मी गडकरींचे मनापासून आभार मानते. त्यावेळी उपस्थितांपैकी एकाने मानलेच पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली. या सर्व घोषणांचा प्रकार पाहून सुळेही काहीशा नाराज झाल्या आणि संतप्तही दिसून आल्या. त्या म्हणाल्या, मीसुद्धा उत्तर देऊ शकते. पण ते हे व्यासपीठ नाही. आपण पक्षासाठी नाही तर गडकरी यांचे आभार मानण्यासाठी एकत्र आलो आहोत.