ब्रेकिंग! चेन्नईत रोहित, विराट-शुभमनचा फ्लॉप शो
बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिमयवर आज भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-११ मध्ये तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंचा समावेश केला आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीपचा वेगवान गोलंदाज म्हणून तर जडेजा आणि अश्विनचा फिरकी गोलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ जेव्हा फलंदाजीसाठी क्रीझवर आला तेव्हा दिग्गज खेळाडू काही तरी खास करतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. कारण, टीम इंडिया मोठ्या ब्रेकनंतर मैदानावर परतली आहे. पण टीम इंडियाचे टॉप तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले.
यात रोहितने सहा धावा केल्या तर, गिल शुन्यावर बाद झाला. यानंतर विराट कोहलीही अतिशय वाईट फटका खेळून सहा धावा करून बाद झाला. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित बांगलादेशचा वेगवान गोलंदाज हसन महमुदचा बळी ठरला. वास्तविक १९४ दिवसांनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या रोहितकडून बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी अपेक्षित होती, मात्र तो धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसला. पहिल्या डावात केवळ सहा धावा करून रोहित बाद झाला.