राजकीय
लोकसभेपूर्वी गडकरींना मिळाली होती पंतप्रधानपदाची ऑफर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट केला. नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, मला कोणाचे नाव घ्यायचे नाही, पण एक व्यक्ती मला म्हणाला होता, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ.
नागपूर येथे विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या स्व.अनिलकुमार पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात गडकरी बोलत होते.
गडकरी पुढे म्हणाले, विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती. मात्र मी ती नाकारली. मी नेत्याला सांगितले की, मी एक विचारधारा मानणारा व्यक्ती आहे. मी अशा पक्षात आहे, ज्याने मला जे हवे होते ते सर्व दिले आहे. कोणताही प्रस्ताव मला मोहात पाडू शकत नाही.
दरम्यान गडकरी यांनी विरोधी पक्षनेत्याचे नाव उघड केले नाही किंवा घटनेची माहितीही दिली नाही. ते म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी एका वरिष्ठ विरोधी पक्ष नेत्याने माझ्याशी संपर्क साधला होता.