खेळ
ब्रेकिंग! बांगलादेशने काढली इज्जत
- रावळपिंडीत बांगलादेश क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. नझमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा ६ विकेटने पराभव केला. यासह बांगलादेशने दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० ने जिंकली.
बांगलादेशने प्रथमच पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका जिंकली आहे. बांगलादेशच्या या ऐतिहासिक विजयात मेहंदी हसन मिराज, लिटन दास, हसन महमूद आणि नाहिद राणा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
कसोटी मालिकेतील पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानला दुसरा कसोटी सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा होता, पण शान मसूदच्या संघाला ते शक्य झाले नाही.
दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसात वाहून गेला. यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचे फलंदाज फ्लॉप ठरले आणि पहिल्या डावात संघाला केवळ २७४ धावाच करता आल्या. यानंतर बांगलादेशच्या पहिल्या डावात खूपच खराब सुरुवात झाली. २६ धावांवर त्यांचे ६ फलंदाज बाद झाले होते. पण यानंतर संघाने जबरदस्त झुंज दिली. लिटन दासने १३८ धावा केल्या. तसेच मेंहदी हसन मिराजने ७८ धावा केल्या आणि गोलंदाजीत ५ विकेट घेतल्या. बांगलादेशने ६ बाद २६ वरून २६२ धावा केल्या.
त्यानंतर दुसऱ्या डावातही पाकिस्तानचे फलंदाज फ्लॉप राहिले. अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, शान मसूद आणि सौद शकील हे सर्व फ्लॉप झाले आणि संपूर्ण संघ अवघ्या १७२ धावांत गारद झाला. पहिल्या डावातील १२ धावांच्या आघाडीच्या जोरावर पाकिस्तानने बांगलादेशसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
चौथ्या दिवशी झाकीर हसन आणि शादमान इस्लाम यांनी बांगलादेशला झंझावाती सुरुवात करून दिली. मात्र पाऊस आणि खराब हवामान बांगलादेशच्या विजयात अडथळा ठरले.
यानंतर पाचव्या दिवशी आज इतिहास रचण्यासाठी बांगलादेशला आणखी १४३ धावा करायच्या होत्या. खेळपट्टी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरली होती, परंतु बांगलादेशने जबरदस्त उत्साह दाखवत केवळ ४ विकेट्स गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.