देश - विदेश

ब्रेकिंग! बलात्काऱ्याला आता थेट फाशीच

अलीकडे महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात अल्पवयीन मुलींवर आणि चिमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचारांमध्येही वाढ झाली आहे. दरम्यान, कोलकात्याच्या सरकारी आरजी कार रुग्णालय आणि मेडिकल महाविद्यालयातील महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या झाल्याच्या घटनेनंतर पश्चिम बंगाल सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. विधानसभेच्या विशेष सत्राच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज पश्चिम बंगाल सरकारने बलात्कार विरोधी दुरुस्ती विधेयक सादर केले. हे विधेयक आता एकमताने मंजूर करण्यात आले आहे. या विधेयकामध्ये बलात्कारप्रकरणी दोषींना दहा दिवसांच्या आत थेट फाशी देण्याची तरतूद आहे.
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल रुग्णालय आणि मेडिकल महाविद्यालयात गेल्या महिन्यात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पश्चिम बंगालमध्ये अद्यापही गदारोळ सुरू आहेत. राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी तेथील नागरिकांकडून होत आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने कालपासून विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्याची घोषणा केली होती. या विशेष अधिवेशनात आज राज्याचे कायदामंत्री मोलय घटक यांनी बलात्कारविरोधी विधेयक मांडले. विधानसभेत या विधेयकावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे विधेयक ऐतिहासिक असल्याचे म्हणत बलात्कारातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही सांगितले.
बंगाल सरकारचे हे विधेयक ‘अपराजिता वुमन चाईल्ड बिल’  पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदा आणि सुधारणा विधेयक 2024 आहे. या विधेयकाचा उद्देश पीडितांना न्याय मिळवून देणे आणि बलात्काराच्या दोषींना त्वरित आणि कठोर शिक्षा देणे हा आहे. या विधेयकात बलात्काराच्या दोषींना दहा दिवसांच्या आत फाशी देण्याची तरतूद आहे. हे विधेयक सभागृहाने एकमताने मंजूर केल्यानंतर आता ते राज्यपालांकडे पाठवले जाणार आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्षासह भाजपच्या आमदाराचांही या विधेयकाला पाठिंबा मिळाला आहे.
दरम्यान बलात्कार, सामूहिक बलात्काराच्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी. ही शिक्षा त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या होत नाही तोपर्यंत असेल. त्याचप्रमाणे बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास आरोपींना फाशी दिली जाईल. बलात्कार प्रकरणाचा तपास अहवाल 21 दिवसांच्या आत आला पाहिजे, अशीही तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button