राजकीय
ब्रेकिंग! अर्थमंत्रीपदाला चाटायचे आहे का?

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखले जातात. राज्य सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली.
या योजनेच्या पार्श्वभूमीवर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेतून महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांनी अमरावती येथे जनतेला आवाहन करताना म्हटले की, तुमच्या मतदारसंघात चार हजार कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे पुन्हा देवेंद्र भुयार यांना संधी द्या.
जनसन्मान यात्रेत बोलताना अजितदादा यांनी लाडकी बहीण योजना सुरू राहील, असे आश्वासन दिले. तसेच आज कित्येक लोक शेतकऱ्यांच्या बाता मारतात, पण मी शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो. त्यामुळे मला शेतकऱ्यांच्या वेदना माहिती आहेत. ताकाला जायचे आणि भांडं लपवायचे असे माझं धोरण नाही.
मी काय साधू संत नाही. हाडामासाचा माणूस आहे. मी तुमच्या मतदारसंघात चार हजार कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे पुन्हा देवेंद्र भुयारला संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले.
आम्ही केवळ लाडकी बहीण योजनेवरच थांबलो नाही तर ज्या गरीब मुली शिकू शकत नाहीत त्यांच्यासाठी योजनाा आणली आहे. 50 टक्के शुल्क भरू शकत नसल्याने काही मुलींनी जीवन संपवले. फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मुली जर जीवन संपवत असतील तर या अर्थमंत्रीपदाला काय चाटायचे आहे का? सत्ता येत राहील आणि जात राहील, परंतु माणूस जगला पाहिजे व मुलगी शिकली पाहिजे, असे रोखठोक वक्तव्य अजितदादा यांनी जनसन्मान यात्रेत केले.