राजकीय
अजितदादांचा नवा डाव
राज्यातील विविध राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीत जास्त चढाओढ दिसून येत आहे. अजून जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. मात्र त्याआधीच अजितदादांनी दबावाचे राजकारण सुरू केले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीतील कामगिरी पाहता त्यांना किती जागा मिळतील याची शाश्वती नाही. मात्र अजितदादांनी
आधीच किती जागा पाहिजे आहेत, याचा आकडाच सांगून टाकला आहे.
आपल्याकडे असणाऱ्या 54 जागांवर आपण लढणारच आहोत. पण एकूण 60 जागांवर आपल्याला काम करायचे आहे, असे अजितदादा म्हणाले. मुंबईत काल अजितदादा गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत अजित पवारांनी महायुतीला अनपेक्षित असे वक्तव्य केले. याबरोबरच आणखी काही आमदार आपल्या संपर्कात असून ते लवरकरच पक्षात प्रवेश करतील, असे अजितदादा म्हणाले. दरम्यान, आता अजितदादा यांनी थेट आकडाच जाहीर केल्याने महायुतीत अस्वस्थता निर्माण होणे साहजिकच आहे.
महायुतीत अद्याप जागावाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या नाहीत. निवडणुकीला अजून दोन महिन्यांचा काळ बाकी आहे. त्यामुळे इतक्यात चर्चा सुरू होतील, याची शक्यता कमीच आहे. तरीदेखील घटक पक्षांकडून दबावाचे राजकारण केले जात आहे.