महाराष्ट्र
नियतीचा भलताच डाव; रक्तदाब वाढला, गौरी कायमची गेली
राज्या पोलीस दलातील २८ वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलचा अंधेरीतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कानावर शस्त्रक्रिया करण्याआधी गरजेपेक्षा जास्त भूल (अॅनेस्थेशिया) दिली गेल्यामुळं हा अनर्थ घडल्याचे समोर आले आहे. आंबोली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
गौरी सुभाष पाटील असे मृत्यू झालेल्या महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. त्या कांदिवली इथं राहत होत्या. मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्र विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कानावरील शस्त्रक्रियेसाठी त्यांना अंधेरी (पश्चिम) येथील ॲक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गौरी यांच्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते, मात्र डॉक्टरांनी अचानक गुरुवारी ती करण्याचा निर्णय घेतला.
शस्त्रक्रियेआधी त्यांना भूल देण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली, अशी माहिती गौरी यांचे बंधू विनायक पाटील यांनी दिली.
रक्तदाब वाढल्यामुळे गौरीची प्रकृती खालावली आहे. तिला आयसीयूमध्ये हलवावे लागत आहे, असे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले. मात्र काही तासांनंतर त्यांनी कोणतेही स्पष्ट कारण न देता तिच्या निधनाची बातमी दिली. मात्र हा मृत्यू अॅनेस्थेसियाच्या ओव्हरडोसमुळे झाल्याचे नंतर आम्हाला समजले, असे विनायक पाटील यांनी सांगितले.