महाराष्ट्र
अंगणवाडीत आगीचा भडका, १५ चिमुकल्यांचा जीव संकटात

राज्यातील एका अंगणवाडीतील दुर्घटना टळली आहे. यामध्ये शिक्षकाने दाखवलेल्या समय सूचकतेमुळे सुमारे 15 चिमुकल्यांचा जीव वाचला आहे. परभणी जिल्ह्यात ही घटना घडली. या जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील गडदगव्हाणवाडी येथे ही घटना घडली आहे.
या गावातील सार्वजनिक विहिरीजवळ नेहमीप्रमाणे अंगणवाडीची शाळा भरली होती. दरम्यान अंगणवाडी सेविका जनाबाई राठोड व कमलबाई राठोड या चिमुकल्यांसाठी जेवण बनवत होत्या. मात्र अचानक गॅसच्या नळीने पेट घेतला आणि संपूर्ण परिसरात धूर पसरला.
हा प्रसंग पाहून अंगणवाडीच्या बाहेर मोठी गर्दी झाली. जनाबाई आणि कमलबाई या आपल्या परीने त्या चिमुकल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र वाढत्या धुरामुळे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरत होते. तसेच सिलेंडर असलेल्या खोलीत जाण्याचे धाडस कोणीच करत नव्हते.
मात्र या सर्व प्रकारामुळे सुमारे 15 चिमुकल्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न उपस्थित झाला होता. देव तारी त्याला कोण मारी या युक्तीप्रमाणे एक शिक्षक या संकटात धावून आला. त्याच परिसरातील शारदा विद्यालयातील शिक्षक प्रवीण राठोड शाळेतून घरी जात होते. अंगणवाडीतील धूर,आता अडकलेली चिमुकले आणि बाहेर जमलेला जमाव हे दृश्य पाहून राठोड क्षणभर थांबले.
प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी ओले पोते घेऊन जिथे गॅस आहे तिथे झडप घातली. तसेच त्यांनी तात्काळ सिलेंडरचा रेग्युलेटर बंद केला. त्यामुळे पेटलेली गॅस शेगडी विजली आणि तेथे अडकलेल्या 15 चिमुकल्यांना सुखरूप पणे बाहेर काढण्यात आले. या घटनेत राठोड यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. अन्यथा पेटलेल्या गॅसचा स्फोट होऊन मोठे दुर्घटना घडली असती. राठोड यांनी दाखवलेल्या या धाडसाबद्दल त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.