राजकीय
ब्रेकिंग! ठाणे, कल्याणमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे.
आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे. दरम्यान कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे आणि ठाणे मतदारसंघातून नरेश म्हस्के यांना महायुतीकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. ठाणे मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली असून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे, मात्र दुसरीकडे महायुतीकडून आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा अद्यापही झाली नव्हती.
ठाणे मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटाचा दावा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे हेच कल्याण मतदारसंघाचे उमेदवार असतील अशी घोषणा आधीच केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असूनही विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा न झाल्याने उलट सुलट चर्चा सुरू होत्या. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
ठाणे मतदारसंघात म्हस्के तर कल्याण मतदारसंघातून शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कल्याणमध्ये महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे अशी लढत होणार आहे. ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर इथे दोन गट पडले आहेत.ठाकरे गटाने ठाण्यातून विद्यमान खासदार राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात आता शिंदे गटाने मस्के यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.