क्राईम
बाईकच्या चाकात पदर अडकला अन् अनर्थ घडला

- बाईकच्या चाकात पदर अडकून खाली पडल्याने महिलेच्या डोक्याला मार लागला आणि दोन चिमुकल्यांनी आपल्या आईला गमावले आहे. पल्लवी आशिष नवलकर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी नवलकरचा विवाह चार वर्षांपूर्वी अकोल्यातील दहिगाव गावंडे येथील आशिष नवलकर यांच्यासोबत झाला होता. त्यांचा सुखाचा संसार सुरू होता. दोघांनाही गोंडस दोन चिमुकल्या मुली झाल्या. मोठी मुलगी दोन वर्षांची तर लहान केवळ ११ महिन्यांची आहे.
- पल्लवी पती आशिष बरोबरअकोल्यातीलच दोनद येथील आसरा देवीच्या दर्शनाला दुचाकीने निघाली होती. वाटेत कानशिवणी गावाजवळ पल्लवीचा पदर बाईकच्या चाकात अडकला आणि पल्लवी बाईकवरून खाली कोसळली. खाली कोसळताच पल्लवीच्या डोक्याला जबर मार लागला. तिच्या मांडीवर असलेल्या ११ महिन्याची तिची मुलगीही जखमी झाली.
- दरम्यान पल्लवीला आणि ११ महिन्याच्या चिमुकलीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे चिमुकलीसह पल्लवीवर उपचार सुरू होते. मात्र, पल्लवीने दोन्ही चिमुकल्यांना पोरकं करत अखेरचा श्वास घेतला. यावेळी ११ महिन्याची चिमुकली आईचे दुध प्यायला तळमळत होती. हे पाहून गाव सुन्न झाले.