अत्यंत क्रूरता, प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून

एका कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पश्चिम बंगाल राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करत राज्यातील हजारो ज्युनियर डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे.
कोलकाता येथील सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला. ती चेस्ट मेडिसिन विभागात द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. तिच्यावर आधी बलात्कार आणि नंतर हॉस्पिटलमध्ये तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये महिला डॉक्टरचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच कोलकाता पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करण्यास सुरुवात केली आणि फुटेजच्या आधारे संभाव्य संशयितांची यादी तयार केली. पोलिसांना घटनास्थळी एक ब्लूटूथ हेडफोन सापडला आहे.