मनोरंजन
तयार राहा… ‘बाहुबली’ पुन्हा येतोय!
बाहुबली आणि बाहुबली २ सारख्या उत्कृष्ट चित्रपटांनंतर आता दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी आपल्या आगामी सीरिजची घोषणा केली आहे. म्हणजेच पुन्हा एकदा प्रेक्षकांना ‘बाहुबली’ची नवी भेट मिळणार आहे. ‘बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड’ असे या आगामी वेब सीरिजचे नाव असून, राजामौली यांनीच या सीरिजची घोषणा केली आहे. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’च्या यशानंतर या वेब सीरिजबद्दल ऐकून चाहते आता खूप खुश झाले आहेत.
पुन्हा एकदा ‘बाहुबली’ परतून येतोय, असे म्हटल्यावर चाहते देखील आतुर झाले आहेत.
राजामौली यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी ही अप्रतिम भेट जाहीर केली असून, या ट्रेलरची माहितीही दिली आहे. मात्र, ही ‘बाहुबली’ ही वेब सीरिज ॲनिमेटेड असणार आहे. ‘बाहुबली: द क्राउन ऑफ ब्लड’च्या पोस्टरचा टीझर शेअर करताना एसएस राजमौली यांनी सांगितले की, या सीरिजचा ट्रेलर लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार असून, लवकरच प्रदर्शित होणार आहे. राजामौली यांनी इन्स्टा स्टोरी आणि ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या ‘बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड’ या नवीन सीरिजची पहिली झलक दाखवली आहे. दिग्दर्शकाने शेअर केलेल्या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ‘बाहुबली’चे नारे देखील ऐकू येत आहेत.
ॲनिमेटेड सीरिजमधील कलाकार कोण असतील किंवा या सीरिजची कथा काय असेल? याबाबत राजामौली यांनी अद्याप काहीही सांगितलेले नाही.