मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. वाल्मिक याच्यावरही मोक्का कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा, यासाठी देशमुख यांचे कुटुंबीय आणि विरोधकांचा दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. काही महिला चांगल्याच आक्रमक झाल्या असून अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यान, आता वाल्मिक यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. जातीयवाद करून वाल्मिक यांना अडकवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप समर्थकांकडून केला आहे. विशेष बाब म्हणजे समर्थकांनी आज परळीत रस्त्यावर टायर जाळले. तर वाल्मिकच्या आईने पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले.
वाल्मिकच्या मातोश्री आता मैदानात उतरल्या आहेत. लेकाच्या न्यायासाठी वाल्मिकच्या मातोश्रींनी परळी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. अशातच परळीत वाल्मिकचे समर्थक आक्रमक झाले. वाल्मिकच्या आईने आता न्यायायासाठी परळीतील शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत माझ्या मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे कराड यांच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले.