सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. यात खंडणी प्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराडची 14 दिवसांची पोलिस कोठडी आज संपली आहे. वाल्मिकला आज केज न्यायालयात हजर करण्यात आले. या ठिकाणी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला.
वाल्मिकचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी जोरदार युक्तिवाद करत माझ्या क्लाइंटला विनाकारण अडकवले जात असल्याचा युक्तिवाद केला. युक्तिवाद झाल्यानंतर वाल्मिकला केज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. तर मोक्का देखील लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे सीआयडीने आता कोर्टाकडे अर्ज केला असून त्वरीत वाल्मिकला चौकशीसाठी आमच्याकडे देण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, न्यायालयात नेण्यापूर्वी बीड शहर पोलिस ठाण्यात डॉक्टरांना बोलावून वाल्मिकची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याच्यावर सध्या फक्त खंडणीचा गुन्हा दाखल असला तरी वाल्मिकच्या सांगण्यावरुनच देशमुख यांना ठार मारण्यात आल्याचा आरोप होत आहे.