बुमराहने केला सर्वात मोठा खुलासा
अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावल्यानंतर काल भारतीय संघ मायदेशी परतला आहे. मुंबईत टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते उपस्थित आहे. मरीन ड्राइव्हपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघाली होती. वानखेडे स्टेडियमवर बीसीसीआयने विश्वविजेता टीम इंडियाचा सत्कार केला आणि संपूर्ण संघाला 125 कोटी रुपयांचा चेक दिला. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली होती. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ही ट्रॉफी देशाला समर्पित केली आहे. यावेळी रोहित म्हणाला की, मला ट्रॉफी जिंकून खूप आनंद झाला आहे. विश्वचषकातील प्रत्येक सामना जिंकणे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. मला खूप आनंद होत आहे की मी प्रत्येक भारतीयांचे स्वप्न पूर्ण करू शकलो.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली म्हणाला की, जसप्रीत बुमराहने देशाला सर्वात मोठे गिफ्ट दिले. त्याच्यासारखा गोलंदाज फक्त एकदाच येतो. यावेळी बुमराह म्हणाला, वानखेडे माझ्यासाठी खूप खास आहे. या मैदानावरून मी माझ्या आयपीएल करिअरला सुरुवात केली होती. भारतीय क्रिकेटला पुढे नेणे हे आपल्या सर्वांचे लक्ष्य आहे. मी कोणत्याही सामन्यानंतर रडत नसतो. मात्र फायनलनंतर माझ्या डोळ्यात अश्रू येत होते.