राजकीय

भाजपला सुखद धक्का

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढण्याची जोरदार तयारी केल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अचानक माघार घेतली. यामुळे भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. 

याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज माघारी घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत त्यांना विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देत मनसेने अभिजित पानसे यांची उमेदवारी माघारी घेतली. त्यानंतर आज भाजपला आणखी एक सुखद धक्का बसला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांनी या निवडणुकीत माघार घेत असल्याचे जाहीर केले. 

मोरे हे ठाण्याच्या राजकारणातील मोठे नाव आहे. ते ठाण्याचे माजी महापौर होते. कोकण पदवीधर मतदारसंघातून मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याच मतदारसंघात भाजपचे डावखरे निवडणूक लढत आहेत. मोरेंच्या उमेदवारीने महायुतीतील भाजप आणि शिवेसनाच आमनेसामने आल्याचे चित्र निर्माण झाले होते.
परंतु, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. मनसेपाठोपाठ शिवसेनेचाही अर्ज मागे घेतला गेल्याने या निवडणुकीत महायुती एकदिलाने लढत आहे, असा संदेश दिला गेला. 

Related Articles

Back to top button