सोलापूर
सोलापुरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास अडचण काय? ; प्रणिती शिंदे
सोलापूर : सोलापूर शहराबाबत केंद्रीय स्तरावर सक्षम नेतृत्व नसल्याने तसेच योग्य पालकमंत्री न लाभल्याने सोलापूर शहराचे मोठे नुकसान झाले आहे, असा आरोप करीत नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधारी भाजपला लक्ष केले. याचवेळी त्यांनी सोलापूरचा पाणी व विमानसेवेचा प्रश्न लोकसभेत मांडणार असल्याचेही सांगितले.
शहरातील नालेसफाई, पाणी प्रश्न,खराब रस्ते, समांतर जलवाहिनी आधी संदर्भात आढावा घेण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे या महापालिकेत आल्या होत्या. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
सक्षम नेतृत्वाभावी सोलापूरचे झालेले नुकसान भरून काढण्याची वेळ आता आली आहे. 99 कोटींच्या नालेबांधणीचा तसेच अमृत दोन अंतर्गत 433 कोटींच्या प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे.या संदर्भात या विभागाचे सचिव गोविंदराज यांच्याशी आपण फोनवरून चर्चा केली आहे. या संदर्भात पुढील पाठपुरावा करणार आहे.
दरम्यान या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. शहरात दररोज 180 एमएलडी पाण्याचा उपसा होत असताना दोन दिवसात पाणीपुरवठा करण्यास काय अडचण आहे असा प्रश्न खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला. यावर प्रशासनाने त्यांना साठवण क्षमतेचा अभाव असल्याचे सांगितले.
अमृत दोन या योजनेमध्ये स्टोरेज आणि उर्वरित पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन दिवसात पाणीपुरवठा देणे शक्य होईल, असे उत्तर यावेळी प्रशासनाने दिले.
सोलापूर शहरामध्ये नालेसफाई, ड्रेनेजचे लाईन स्वच्छतेचे हे काम चांगल्या पद्धतीने न झाल्यामुळे पहिल्याच पावसामध्ये लोकांच्या घरात पाणी गेले, असा आरोप टीका खासदार शिंदे यांनी यावेळी केला. यावर भुयारी गटार आणि पावसाळी गटार या दोन्ही कामांचे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत ते झाल्यास नाल्यांची, गटारींची दुरुस्ती होईल आणि पावसाळी पाण्याच्या लाईनचीही दुरुस्ती होईल, असे उत्तर प्रशासनाने दिले. खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी पुन्हा एकदा नाले सफाई करण्याची सूचना प्रशासनाला केली.