काँग्रेस- ठाकरे गटात पुन्हा राडा
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. लोकसभेप्रमाणेच ठाकरे यांनी चारही जागेवर परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेसने नाराज व्यक्त केली आहे.
त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीत असताना अशाप्रकारे चर्चेच्या अगोदर घोषणा करणे चुकीचे आहे. त्यामुळे ठाकरे गटाने मुंबईतून विधान परिषदेसाठी भरलेले अर्ज कायम ठेवावेत. मात्र कोकण आणि नाशिक शिक्षक उमेदवार ठाकरे यांनी मागे घ्यावेत. तर पटोलेंसह काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला हेदेखील ठाकरे गटाच्या या भूमिकेवर नाराज आहेत.
तर ठाकरेंना उमेदवार मागे घेण्याचा निरोप देण्यासाठी मी आज सकाळपासून फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्याकडून कोणताही निरोप येत नाही. तसेच ठाकरेंशी संपर्कही झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे? हेच कळत नसल्याचे पटोले यांनी सांगितले. दरम्यान या अगोदर लोकसभा निवडणुकीमध्ये देखील ठाकरे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने कॉंग्रेस नेत्यांसह कार्यकर्ते नाराज झाले होते.