देशात एनडीएचे सरकार स्थापन होत असून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत एकूण 52 ते 55 मंत्री शपथ घेऊ शकतात. त्यामध्ये राज्यातील पाच जणांना फोन आलेले आहेत. त्यामध्ये पुण्याच्या मुरलीधर मोहोळांसह रक्षा खडसे, प्रतापराव जाधवांचीदेखील केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लागणार आहे.
राज्यातील गेल्या दोन मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे नितीन गडकरी, पियुष गोयल, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले या नेत्यांचादेखील समावेश आहे. यामध्ये राज्यातील महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा रंगली होती. त्यांना मात्र अद्याप कोणताही फोन आलेला नाही, त्यामुळे अजितदादा हे अद्याप मंत्रीपदासाठी वेटिंगवर असल्याचे दिसत आहे. दरम्यान शपथविधी समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या अतिथींसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.