क्राईम

लग्नास नकार दिल्याने…

काल सकाळी एक धक्कादायक घटना घडली. लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीची पंजाबच्या मोहालीमध्ये भर रस्त्यात तलवारीने हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मृत तरुणी कामावर जात असताना आरोपीने तिच्यावर हल्ला केला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बलजिंदर कौर (वय, २६) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव उघड झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बलजिंदर ही मोहालीच्या फेज पाचमधील एका बँकेत काम करत होती. नेहमीप्रमाणे ती काल सकाळी ड्युटीवर जात असताना आरोपीने तिच्यावर तलवारीने हल्ला केला. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बलजिंदरने खूप प्रयत्न केले. मात्र, आरोपीने तिचा पाठलाग करत तिच्यावर तलवारीने हल्ला केला. तरुणी जखमी होऊन खाली पडल्यानंतरही आरोपीने तिच्यावर हल्ला सुरूच ठेवला. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. जखमी अवस्थेत तरुणीला मोहालीच्या सिव्हिल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील आरोपीचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. मुलगी रिक्षामधून उतरताच आरोपीने तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली आणि सोबत घेऊन आलेल्या तलवारीने तिच्यावर हल्ला केला.
आरोपीच्या आईचे म्हणणे आहे की, मृत तरुणीचे माझ्या मुलासोबत प्रेमसंबंध होते आणि ती दोन वेळा त्यांच्या घरीही आली होती. तिने त्याच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते आणि आता ती नकार देत होती. त्यामुळे माझा मुलगा नैराश्यात गेला होता.

Related Articles

Back to top button