महाराष्ट्र

…तर अकोल्यात गेम झाला असता

वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. प्रकाश आंबेडकर यांचाही अकोला लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. महाविकास आघाडीसोबतच्या वाटाघाटी फिस्कटल्यानंतर वंचितने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल आंबेडकरांनी आता खुलासा केला आहे. आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत.
आंबेडकर यांनी एक दीर्घ पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लोकसभा निवडणुकीतील निकालामुळे निराश झालो असल्याचेही म्हटले आहे. त्याचबरोबर विधानसभेची तयारी करणार असल्याचेही स्पष्ट केले.
आम्ही जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारला आहे. आम्ही निराश झालो आहोत पण, आशा सोडलेली नाही. आम्ही आत्मपरीक्षण करून वंचित आघाडीच्या रणनीतीतील त्रुटी तपासून आवश्यक त्या उपाययोजना जरूर करू. मतदारांबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही.
महाविकास आघाडीतील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामावून घेतले नाही. आम्हाला बैठकांसाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ते सर्व मीडिया आणि मतदारांसाठी होते. आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो आणि मतदारांना आमचा झालेला अपमान आणि आमच्या पक्षाप्रती महाविकास आघाडीची संकुचित वृत्ती पटवून देण्यात सपशेल अपयशी ठरलो. उत्तर मुंबईची न जिंकता येणारी जागा होती, तर अकोल्याच्या जागेत कधीही गेम होऊ शकतो. इंडिया आघाडीबरोबर जाऊन पडणे आणि स्वत:च्या ताकदीवर लढणे यात फरक आहे. स्वत:च्या ताकदीवर लढून टिकण्याचा मार्ग कायम राहतो आणि म्हणून आम्ही टिकण्याचा मार्ग स्वीकारला, असे आंबेडकरांनी सांगितले.

Related Articles

Back to top button