भरसभेत अजितदादा चुकले

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी दिसत आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचारांना वेग आला आहे. आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. परिणामी निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आता मंगळवारी मतदान होणार आहे. दरम्यान, साताऱ्यात महायुतीने उदयनराजे भोसलेंना उमदेवारी दिली.
तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे रिंगणात आहे. महायुतीच्या नेत्यांकडून थेट पंतप्रधान मोदींच्या नावावर मत मागितली जात आहेत. साताऱ्यातील सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी मोदींचे कौतुक करत भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत काम करा आणि महायुतीच्या उमेदवाराला विजयी करा, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी दादांकडून बोलण्याच्या ओघात एक चूक झाली. मात्र, त्यांनी लगेच आपली चुक दुरूस्त केली.
उदयनराजे यांच्या प्रचारासाठी आज महायुतीची साताऱ्यात सभा झाली. या सभेला संबोधित करताना अजितदादा काँग्रेसच्या काळात पंतप्रधानांवर झालेल्या आरोपांवर बोलत होते. राहुल गांधींवर बोफोर्सचा आरोप झाला, असे ते बोलून गेले.
पण तितक्यात कोणीतरी त्यांची चूक लक्षात आणून दिली. अजितदादा यांनी त्यांचे आभार मानले. बरे झाले चूक निदर्शनास आणून दिली, नाहीतर तेच दाखवत बसले असते, असा टोला अजितदादा यांनी माध्यमांवर लगावला. अजितदादा म्हणाले, मी चुकून राहुल गांधी असे म्हणालो. मला राजीव गांधी म्हणायचे होते. करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद, असे म्हणत त्यांनी आपले भाषण सुरू ठेवले.