सध्या लोकसभेची लगबग सुरु आहे. दरम्यान कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाची रणनीती ठरत नसून आता पक्षाने दोन उमेदवार जाहीर केले आहेत. शिंदेची शिवसेना व ठाकरेंची शिवसेना यांच्यातील युद्ध दिवसांगणिक पेटू लागले आहे.
मागील महिन्यात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांचे नाव जाहीर करून स्थानिक उमेदवार दिल्याची बोंब उठविण्यात आली. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच, दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाने आपला अजून एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.
जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यामागे उद्धव ठाकरे यांची रणनीती काय? हे अद्याप समजू शकले नसले तरी पक्षाकडून आलेल्या आदेशाचे पालन करत मी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तसेच अर्जात एखादी त्रुटी राहिली तर खबरदारी म्हणून मी अर्ज दाखल करत असून, गरज पडल्यास पक्षाकडून योग्य त्या उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म लावला जाईल, असेही ते म्हणाले. एकीकडे दरेकर यांच्या विरोधात पक्षातील अंतर्गत कार्यकर्त्यांची नाराजी तर दुसरीकडे सहयोगी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलून त्यांची ओढवलेली नाराजी याचा परिणाम म्हणून तर पक्षाने जाधव यांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना केल्या असाव्यात, अशी शक्यता ही वर्तवली जात आहे.