राजकीय

राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना?

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, सोलापूर मतदारसंघात मागील वेळी भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी विजय मिळवला होता. आता हेच रेकॉर्ड कायम ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
परंतु, यंदा चेहरा बदलला आहे. महायुतीचे उमेदवार राम सातपुते हे आहेत. हिंदुत्ववादी चेहरा अन् हिंदुत्वाचा जोरदार प्रचार करत आहेत. सोबत केंद्र आणि राज्य सरकारची विकासकामे, विविध योजना लोकांसमोर मांडत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदारसंघात येऊन गेले. या जमेच्या बाजू असून वातावरण आपल्या बाजूने राहील, असा विश्वास सातपुते आणि समर्थकांना वाटतो. मतदारसंघात सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे मदत होईल, असा विश्वास सातपुते यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.
शिवाय मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार अतिष बनसोडे उमेदवार आहेत. त्यामुळे लढत तिरंगी झाली आहे. आता मतविभागणी निश्चित आहे. या मतविभागणीचा कुणाला फटका बसणार आणि कुणाला फायदा होणार याचे उत्तर निकालानंतरच मिळणार आहे.
वास्तविक सोलापूर हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ. येथे अकरा वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.
मात्र, मागील दोन निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाला. आता पक्षाने त्यांच्याऐवजी सोलापूर मध्य मतदारसंघातील आमदार प्रणिती शिंदे यांना तिकीट दिले आहे.
सोलापूर मध्य मतदारसंघात त्यांचा हक्काचा मतदार आहे. मतदारसंघात सुशीलकुमार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु, तिसरा उमेदवार रिंगणात आहे. परिणामी प्रणिती यांना मतविभागणीचा फटका बसू शकतो.

Related Articles

Back to top button