क्राईम

पुणे-सोलापूर हायवेवर थरकाप उडवणारी घटना!

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेल्या पुणे शहरात आणखी एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. हॉटेल मालकाने जेवण देण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने ट्रक हॉटेलमध्ये घुसवल्याची घटना घडली आहे. 
यात हॉटेलसह पार्किंगमध्ये असलेल्या गाड्यांचे  नुकसान झाले आहे. इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे काल रात्री ही घटना घडली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
चालक भरधाव वेगाने ट्रकसह हॉटेलच्या गेटला वारंवार धडका देत आहे. त्याला थांबवण्यासाठी आजूबाजूचे लोक ट्रकच्या केबिनवर दगड मारतात. मात्र, ड्रायव्हरला काहीच फरक पडत नसल्याचे दिसत आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक सोलापूरहून पुण्याकडे जात होता. जेवणासाठी त्यानं पुणे-सोलापूर मार्गावरील हिंगणगावातील गोकुळ हॉटेलच्या बाहेर ट्रक थांबवला. ट्रक थांबवून तो हॉटेलच्या आत गेला आणि जेवण मागायला गेला. मात्र, किचन बंद झाल्याने आता जेवण मिळणार नाही असे मालकाने त्याला सांगितले. परिणामी त्याचा संताप अनावर झाला. 
त्या रागातच तो परत आपल्या ट्रककडे गेला आणि ट्रक सुरू केला. सुरुवातीला हॉटेलच्या आवारातील दोन गाड्यांना त्याने धडक दिली व नंतर ट्रक प्रवेशद्वारावर धडकवला. ट्रक मागे-पुढे घेऊन तो सतत गेटला धडक मारत होता. ट्रक चालकाला रोखण्यासाठी शेवटी काही लोकांनी ट्रकवर दगडफेक केली. 
तरीही ट्रक ड्रायव्हर थांबत नव्हता. शेवटी काही वेळानंतर त्याने ट्रक थांबवला. त्यानंतर जमलेल्या लोकांनी त्याला ताब्यात घेतले. तोपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. लोकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. 

Related Articles

Back to top button