राजकीय

स्मृती इराणींविरोधात ‘निष्ठावंता’ला तिकीट

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, अमेठी मतदारसंघातून काँग्रेसने गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला अशी अमेठीची ओळख आहे.

पण, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा भाजपच्या स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. यावेळी कोण, असा प्रश्न चर्चेत होता. अखेर काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शर्मा यांचे नाव जाहीर केले.
शर्मा हे मूळचे पंजाबमधील लुधियानाचे आहेत. 1983 मध्ये शर्मा यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. १९९१ मध्ये राजीव गांधी यांचे निधन झाले. त्यानंतर शर्मा हे गांधी कुटुंबाच्या जवळ येत गेले. अमेठी आणि रायबरेलीमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. काही अपवाद सोडले तर अमेठीतून नेहमी गांधी कुटुंबातील व्यक्तीच जिंकली आहे. राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर १९९१ मधील पोटनिवडणुकीत आणि १९९६ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या सतीश शर्मा यांचा विजय झाला होता.
१९९८ मध्ये या मतदारसंघातून भाजपने विजय मिळवला होता. १९९९ मध्ये माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी विजय झाल्या होत्या. त्यानंतरच्या तीन निवडणुकींमध्ये म्हणजेच २००४, २००९ आणि २०१४ मध्ये राहुल गांधी विजयी झाले. आता अमेठी मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे.

Related Articles

Back to top button