राजकीय
ब्रेकिंग! लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत मनसेला दणका
देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. दरम्यान, सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ठाणे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाधव यांच्यासह दोघांविरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शैलेश जैन (55) असे तक्रारदार सराफाचे नाव आहे. सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांनी वैभव ठक्कर याला झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावले होते. त्यावेळी मनसे नेते जाधव त्यांचे सहकारी, अंगरक्षक व सहा ते सात व्यक्तींनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली.
यावेळी जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावले. जैन यांच्या तक्रारीनंतर ठक्कर व जाधव यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.