ब्रेकिंग! सोलापूर, माढा लोकसभेची निवडणूक महायुतीला कठीण

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, एकीकडे महायुतीत काही जागा वाटपाचे भिजत घोंगडे असतानाच भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटलांनी सोलापूर आणि माढा मतदारसंघाबाबत विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. भाजपासाठी सोलापूर लोकसभेची निवडणूक थोडीशी कठीण तर, माढा लोकसभेची निवडणूक जरा जास्तच कठीण असल्याचे म्हटले आहे.
चंद्रकांतदादांच्या या विधानामुळे माढ्यात शरद पवारांनी मैदानात उतरवलेला भिडूच विजय मिळवणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे या दोन्ही मतदारसंघात भाजपाच्या विजयाबद्दल पाटलांनी चिंतेत टाकणारे विधान जरी केले असले तरी, दुसरीकडे त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
लोकसभेच्या निवडणुकांसाठी राज्यातील मतदारांच्या मनात नेमके काय? याचा आढावा घेणारा 48 मतदारसंघातील ओपिनियन पोलसमोर आला आहे. या पोलनुसार राज्यात महायुतीला लोकसभा निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महायुतीला राज्यात केवळ 30 जागा मिळतील, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. या पोलनंतर महायुतीच्या नेत्यांना घाम फुटलेला असताना चंद्रकांतदादांनी सोलापूर आणि माढा मतदारसंघाचा पेपर कठीण असल्याची कबुलीच दिली आहे.