राजकीय

मनसेचा नवा धमाका

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकांसाठी पक्षाचे मतदारसंघनिहाय समन्वयकदेखील जाहीर केले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यावर दक्षिण मुंबई, संभाजीनगर, जालना, धाराशिव, सांगली या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मनसे नेते आणि मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्याकडे पुणे मतदारसंघाच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले. पक्ष निवडणूक लढणार नसला तरी महायुतीला मदत करणार आहे. त्यासाठी आता पक्षाचे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी समन्वयक जाहीर करण्यात आले आहेत. ही यादी जाहीर करताना संबंधित नेत्यांची माहिती देताना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना प्रचारासाठी पक्षाची भूमिका आणि इतर बाबींसाठी समन्वय साधण्याची सूचना करण्यात आली आहे.
या यादीनुसार ठाणे, नाशिक, जळगाव मतदारसंघासाठी अभिजित पानसे, पालघर, रत्नागिरी सिंधदुर्ग अविनाश जाधव, भिवंडी/कल्याणसाठी आमदार राजू पाटील, अविनाश जाधव आदींकडे जबाबदारी देण्यात आली आहे. नितीन सरदेसाई यांच्याकडे मावळ आणि रायगड मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर संदीप देशपांडे यांच्याकडे बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि दक्षिण मध्य मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button