राजकीय
भाजप राहिली बाजूला, काँग्रेस अन् शरद पवार गटात लागली भांडणं

- राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोमात सुरू आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान ,पंढरपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) आणि काँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे.
- दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांना उमेदवारी दिली आहे. यातच माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भालके यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे भाजपचे आमदार समाधान आवताडे बाजूला राहिले असून राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) आणि काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे.
- पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आघाडीत बिघाडी का झाली? याचा खुलासा धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केला आहे. तसेच, ज्या गद्दाराने हे केले, त्याला 20 नोव्हेंबरला धडा शिकवा, असे म्हणत मोहिते-पाटील यांनी भालके यांच्यावर तोफ डागली.
- मोहिते-पाटील म्हणाले, भालके यांनी काँग्रेसची उमेदवारी आणली. ती उमेदवारी बदलून घेऊ आणि राष्ट्रवादीकडून तुम्हाला उभे करू, असा निरोप भालके यांना देण्यात आला होता. मात्र, भालके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट टाळली. भालकेंनी ज्येष्ठ माणसाला दगा दिला. आता याचे उत्तर शरद पवार यांच्यावर प्रेम करणारी जनता वीस तारखेला देऊन गद्दाराला जागा दाखवेल.