शिंदे गटाने घोळ घातलाच
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल शिंदे गट आमदारांच्या अपात्रतेसंबंधी 34 याचिकांचे सहा गट तयार करून त्यावर सुनावणी घेतली. या सुनावणीत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. हळूहळू या युक्तीवादाचे बाचाबाचीमध्ये रुपांतर झाले. शिंदे गटाच्या वकिलांनी सर्व अपात्रतेच्या याचिकांवर पुरावे सादर करण्यासाठी 14 दिवसांचा वेळ मागितला.
पण, त्यांच्या या मागणीवर ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. मात्र, यावेळी शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या दोन याचिकांमुळे मोठा घोळ झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पुढील सुनावणी दोन नोव्हेंबर रोजी होणार आहे.
नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली, यावेळी ठाकरे गटाने मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांच्या दोन स्वाक्षऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. ठाकरे गट सामंत यांच्या स्वाक्षरीचा आधार घेत होते. ते नंतर शिंदे गटामध्ये गेले. त्यामुळे ते आपल्याच याचिकेवर आक्षेप कसा घेऊ शकतात? असा युक्तीवाद ठाकरे गटाने केला. तसेच शिंदे गटाने पुरावे सादर करण्यासाठी मागितलेल्या 14 दिवसांचा वेळेला विरोध केला.
ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हटले की, सामंत यांच्या दोन परस्परविरोधी याचिकांवर स्वाक्षरी आहे. एका याचिकेवर ते म्हणतात की, उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत, तर दुसऱ्या याचिकेवर ते म्हणातात, उद्धव पक्षप्रमुख नाहीत. हा काय घोळ आहे? असा सवाल करत ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे गटाची याचिका बेकायदेशीर असल्याचे म्हटले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावर परिणाम होईल, असा निर्णय घेऊ नका, असे ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हटले.