सख्खा भाऊच निघाला हैवान
एका भावाने अनुकंपा तत्वावरील नोकरी मिळवण्यासाठी आपल्या दोन बहिणींना सूपमधून विषारी औषध देत त्यांचा खून केल्याची खळबळजनक घटना अलिबाग तालुक्यातील चौळ भोवाळे येथे घडली. यानंतर आरोपीने दृश्यम चित्रपटासारखा बनाव रचून समोरच्या व्यक्तीचे माइंड वॉशिंग करून खोटे – खरे करण्याचा प्रयत्न केला.
सुरुवातीला पोलिसांनीही त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मात्र, यानंतर ठोस पुरावे सापडल्यावर भावानेच बहिणींची हत्या केल्याचे उघड झाले आहे.
गणेश मोहिते, असे आरोपीचे नाव आहे तर सोनाली मोहिते (वय ३४) व स्नेहल मोहिते (वय ३०) असे खून झालेल्या बहीणींची नावे आहेत. चौल भोवाळे गावात जेवणातून विषबाधा झाल्याने सोनाली आणि स्नेहल या दोघी बहिणींनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान सोनालीचा त्याच दिवशी तर दुसरी बहिण स्नेहलचा एम.जी.एम रुग्णालयमध्ये मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी गणेशनेच फिर्याद दिली होती.
दरम्यान, सोनालीच्या मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यात आले. यात धक्कादायक माहिती पुढे आली. सोनालीचा मृत्यू हा जेवणातून विष दिल्याने झाल्याचे समोर आले. परिणामी पोलिसांचा संशय वाढला. त्यांनी तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.
आई व बहिणीसोबत आरोपी गणेशचे पटत नव्हते. त्याचे वडील वन विभागात कामाला होते. त्यांचे काही २००९ मध्ये निधन झाले. यामुळे त्यांच्या जागी कुणाला नोकरी मिळणार तसेच मालमत्तेवरून वाद होता. अनुकंपा तत्वावर नोकरीमध्ये कायम करण्यासाठी लागणारी संमती दोन्ही बहिणी देत नव्हत्या. याचा प्रचंड राग गणेशला होता. २०१९ मध्ये, गणेशने आईला दोन बहिणींची काळजी घेणार असे पटवून दिले आणि नोकरी मिळाली. मात्र, त्याच्या बहिणींनी त्याला सही दिली नव्हती. याचा राग त्याला होता. त्यामुळे त्याने दोघी बहिणींना सूपमधून विष देत ठार मारले.
नातेवाइकांच्या मदतीने गणेशने वडिलांची मालमत्ता आणि पेन्शन स्वत:च्या नावावर करून घेतली होती. गणेशचे वडिलोपार्जित घर असलेल्या रायगडमध्ये ते नातेवाईक राहत होते. हा प्रकार बहिणींना समजताच गणेशचे नातेवाईक आणि बहिणींमध्ये भांडण झाले. यामुळे त्याने खुनाचा भयंकर कट रचला.
अलीकडे गणेश हा त्याच्या मुळ गावी रेवदंडा येथे कुटुंबाला घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने बहिणींना सूपमधून विषारी औषध पाजले. यानंतर त्याच्यावर संशय येईल, या भीतीने त्याने नातेवाईक आणि त्याच्या बहिणींमध्ये यापूर्वीही भांडण झाल्याचा बनाव केला. यानंतर पोलिसांचे लक्ष भरकटवण्यासाठी नातेवाईक व शेजाऱ्यांनी हे केले, असे वातावरण गणेशने निर्माण केले.
दरम्यान, पोलिसांनी तपास केला असता गणेशने गुगलवर विविध विषारी औषधांची माहिती घेतल्याचे कळले. यात वास न येणाऱ्या विषारी औषधांचा देखील त्याने अभ्यास केल्याचे पुढे आले. यानंतर पोलिसांचा संशय वाढल्याने त्यांनी गणेशच्या कारची तपासणी केली.
यात त्यांना उंदीर मारण्याचे रेटोल औषधाची माहिती असणारा कागद सापडला. यानंतर त्याला पोलिसी हिसका दाखवताच त्याने बहिणींना विषारी औषध दिल्याचे कबूल केले. यासाठी तो एक महिन्यापासून प्लॅनिंग करत होता. यासाठी त्याने घरात बहिणींना सूप बनविणे आणि सुपचे आरोग्यासाठी महत्व आणि फायदे सांगणे सुरू केले. यानंतर त्याने त्यांना सूपमधून विषारी औषध दिले.