राजकीय
आता बीआरएसचा ठाकरे गटाला दणका

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मैदानात उतरुन नव्याने पक्ष उभारणीला सुरुवात केली. मात्र, तरी देखील ठाकरे गटातील आऊटगोईंग काही थांबले नाही. सुमारे ३० वर्षाहून अधिक काळ ठाकरेंसोबत एकनिष्ठ असलेल्या शिवसैनिकाने अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.
कोपरगाव शहरातील ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यासह बीआरएस पक्षात प्रवेश केला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. राज्यातील आघाडी आणि महायुतीच्या राजकरणात निष्ठावान शिवसैनिकाला न्याय मिळणे अवघड असून प्रस्थापितांना मदत करण्याशिवाय पर्याय राहिला नाही, अशी भावना जाधव यांनी व्यक्त केली. शेतकरी प्रश्नासह तालुक्यातील सर्व प्रश्नांसाठी वज्रमूठ बांधून लोकांच्या न्याय हक्कासाठी भारत राष्ट्र समिती पक्ष पूर्णपणे ताकतीने कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभा राहणार असल्याचे जाधव म्हणाले.