खेळ
बाबरपेक्षा जास्त प्रेम देऊ… पाकिस्तानी चाहत्यांची विराटला भावनिक साद

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. आपला शेजारी देश पाकिस्तानातही विराटचे कोट्यवधी चाहते आहेत. याचा नमुना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मुल्तान कसोटीत पाहायला मिळाला.
सामन्याच्या चौथ्या दिवशी दोन पाकिस्तानी प्रेक्षक हातात कोहलीशी संबंधित पोस्टर झळकवताना दिसले. या पोस्टर्सद्वारे दोन्ही चाहत्यांना कोहलीला आशिया कप खेळण्यासाठी पाकिस्तानात येण्याची विनंती केली आहे. एका पोस्टरवर ‘हाय, किंग कोहली’, आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात ये,’ असे लिहिलेले आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये ‘आम्ही तुला आमच्या किंग बाबर आझमपेक्षा जास्त प्रेम देऊ’ असे लिहिले होते.
कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने ११३ धावांची खेळी केली. कोहलीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे ७२ वे शतक होते.
यासह कोहलीने पॉन्टिंगला मागे टाकले आहे. आता कोहली सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनच्या नावे १०० आंतरराष्ट्रीय शतक आहेत.