शिंदे-ठाकरे गटात फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

उल्हासनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटात जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. सध्या या राड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक चार येथील एसएसटी कॉलेज जवळ ही घटना घडली आहे.
दिवसाढवळ्या रस्त्यावर ही फ्री स्टाईल हाणामारी सुरू होती. उल्हासनगर शहरात शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून एसएसटी कॉलेज परिसरातील रस्त्याचे काम मंजूर झाले होते. या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी स्वतः खासदार शिंदे येणार असल्याने शिंदे गटाचे पदाधिकारी अरुण आशान आणि विजय जोशी हे कार्यकर्त्यांसह तिथे गेले होते.
यावेळी या परिसरातील माजी नगरसेविका विमल वसंत भोईर यांच्या मुलांनी काही साथीदारांसह विजय जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला.
यामध्ये जोशी यांच्या एका कार्यकर्त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर स्वतः जोशी यांनाही यावेळी मारहाण करण्यात आली. दरम्यान, या सगळ्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर विजय जोशी यांनी तक्रार करण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.