चोवीस तासांत तुझे फालतू नेटवर्क संपवून टाकीन…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गुन्हेगारांनी गोळ्या झाडून हत्या केली. काल सकाळी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली.
या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत तिघांना अटक केली आहे. तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणावरुन आता बिहारमधील पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी सोशल मीडियावरुन गुंड लॉरेन्स बिश्नोई यांना ओपन चॅलेंज दिले आहे. कायद्याने मला परवानगी दिली तर मी चोवीस तासांत लॉरेन्सची टोळी व त्याचे नेटवर्क संपवू शकतो. हा देश नपुंसक झाला आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
खासदार पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर लिहिले की, हा देश आहे की षंढांची फौज. तुरुंगात बसलेला गुन्हेगार आव्हान देत आहे. लोकांना मारतोय, सगळेच केवळ प्रेक्षक बनले आहेत. कधी मूसेवाला, कधी करणी सेनेचा प्रमुख आणि आता उद्योगपती, राजकारण्याची हत्या झाली. यासोबतच यादव यांनी बिश्नोईला ओपन चॅलेंज देत सांगितले की, कायद्याने परवानगी दिली तर बिश्नोईसारख्या वाईट गुन्हेगाराचे संपूर्ण नेटवर्क अवघ्या चोवीस तासांत उद्धवस्त करू शकतो.