आरोग्य
हिवाळ्यात मेथी खाण्याचे फायदेच फायदे

सध्या राज्यातील थंडीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान हिवाळ्यात येणाऱ्या भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. काही भाजीपाल्यांचे दर सुद्धा घसरले आहेत. दरम्यान हिवाळ्यात मेथी भरपूर प्रमाणात खा असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. कारण यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात.
सध्या सोलापुरातसुद्धा मेथीची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या मेथीचे दर सुद्धा कमी झाले आहेत. याचा लाभ तुम्ही नक्की घेऊ शकता. मेथीचे सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे होतात. मेथी तुम्ही अनेक प्रकारे सेवन करू शकता. यामध्ये पराठा, भाजी आणि पुरी आदींचा समावेश आहे.
हवामानातील बदलामुळे तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो. अशावेळी तुम्ही मेथीच्या पानांचे सेवन करू शकता. मधुमेही रुग्णांसाठी मेथीचे सेवन खूप फायदेशीर आहे. मधुमेही रुग्णांच्या साखरेची पातळी वाढते. अशा प्रसंगात मेथीच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच मेथीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते. अशाप्रकारे ही मेथी सर्वांसाठी गुणकारी आहे.