अर्षद मलिक याने लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या तरुणीवर अत्याचार करून तिला 70 तुकडे करण्याची धमकी दिल्याची फिर्याद या तरुणीने पोलिसांमध्ये दिली आहे. या फिर्यादीत तरुणीने आपल्यावर झालेले अत्याचार आणि सक्तीने केलेले धर्मांतर याची भयानक कहाणी सांगितली आहे.ही तरूणी २४ वर्षांची आहे. तिचे पहिले लग्न झाले असून त्या पतीपासून तिला एक मुलगा आहे.
या तरुणीने पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. आपल्याला सक्तीने धर्मांतर करायला लावले, पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आणि या तरुणाच्या पित्याने आपल्यावर अनैसर्गिक अत्याचार केले, असेही पीडिता फिर्यादीत नमूद केले आहे.
अर्शद नावाच्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तरुणाने 29 नोव्हेंबर रोजी ही धमकी या तरुणीला दिली. जुलै 2021 पासून ते दोघे एकत्र राहतात. त्याआधी 4 एप्रिल 2016 रोजी तिचा पहिला विवाह झाला. 2017 मध्ये तिला मुलगा झाला. 2019 मध्ये तिच्या पतीचे रस्ता अपघातात निधन झाले. त्यानंतर तिची एका अकॅडमीत हर्षल माळी नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्याने तिला लळिंग येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
त्याचा छुपा व्हिडिओ बनवून तिला धमकावले. त्यांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतल्यावर जुलै 2021 मध्ये लिव्ह इन रिलेशनशिपबाबत अमळनेर येथे प्रतिज्ञापत्र तयार करायला गेले. ते करताना या तरुणाचे नाव हर्षल नसून अर्शद मलिक असल्याचे तिला समजले. अर्शदने तिला उस्मानाबाद येथे एका फ्लॅटमध्ये नेले. तिथे त्याचा पिता सलीम याने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले, असे या तरूणीने फिर्यादीत नमूद केले आहे.
अर्शदने 4 महिन्यांनी तिला धुळे शहरातील विटा भट्टी भागातील घरी आणले. 26 ऑगस्ट 2022 रोजी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतरही सलीमने तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. दरम्यानच्या काळात अर्शदने तिचे धर्मांतर केले. तिच्या पाच वर्षांच्या पहिल्या मुलाची खतना करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याला विरोध केल्यामुळे अर्शदने तिला दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या बातम्यांची आठवण करून दिली. तिचे तर फक्त 35 तुकडे केले गेले, तुझे आम्ही 70 तुकडे करू, अशा शब्दात त्याने धमकावले, असे पीडिताने फिर्यादीत नमूद केले आहे.