मनोरंजन
‘नॅशनल क्रश’ रश्मिकाच्या चित्रपटांवर कर्नाटकात बंदी येणार?
‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदना हिच्यासमोर आता एक संकट उभे राहिले आहे. रश्मिकाच्या चित्रपटांवर कर्नाटकात बंदी आणणार, अशा आशयाचे एक ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर चर्चांना उधाण आले आहे. ‘पुष्पा’च्या यशानंतर जगभरात रश्मिकाचा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
कर्नाटकात एक असा गट आहे, जो रश्मिकाचा प्रचंड तिरस्कार करतो. आता रश्मिकाबद्दल त्यांना असलेल्या रागाला देखील एक कारण आहे. हे कारण म्हणजे रक्षित शेट्टी. साऊथ अभिनेता रक्षितशी साखरपुडा मोडल्यामुळे रश्मिका चर्चेत आली होती.
रक्षितच्या चाहत्यांना आजही असे वाटते की, रश्मिकाने स्वतःचा फायदा करून घेतल्यानंतर नाते तोडले आणि अभिनेत्याला धोका दिला. याच कारणामुळे कर्नाटकातील चाहते रश्मिकावर नाराज झाले आहेत. नुकताच रश्मिकाचा ‘गुडबाय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी तिने एक मुलाखत दिली, ज्यात तिने स्वतःच्या अभिनेत्री बनण्याच्या प्रवासाविषयी सांगितले. यावेळी आपण या क्षेत्रात नेमके कसे आलो, याबद्दल ती बोलली.
‘किरिक पार्टी’ या चित्रपटातून रश्मिकाला पहिल्यांदा पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार झाली. ‘किरिक पार्टी’ हा चित्रपट रक्षितच्या प्रोडक्शन हाऊसने बनवला होता. मात्र, या मुलाखतीत रश्मिकाने रक्षितच्या नावाचा उल्लेख टाळला. तिची ही मुलाखत पाहताच चाहते आणखी नाराज झाले आहेत.
यानंतर आता कन्नड चित्रपटगृहांचे मालक, चित्रपट संस्था रश्मिकाला कन्नड चित्रपटसृष्टीत बॅन करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर कर्नाटकात तिच्या चित्रपटांवर बंदी घातली जाऊ शकते, इतका रोष चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे.