केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी यावेळी पुन्हा एकदा वाहनांमध्ये पेट्रोलसोबत एका पदार्थ याच्या वापराबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. तसेच जाणूनबुजून पसरवले जाणारे गैरसमज शेतकरी आणि सामान्य जनतेच्या नुकसानीस कारणीभूत ठरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतात इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध झाल्यापासून याबाबत अनेक नकारात्मक चर्चा सुरू झाल्या आहेत. असे म्हटले जाते की इथेनॉलमुळे वाहनांच्या इंजिनवर विपरीत परिणाम होतो आणि इंधन कार्यक्षमता किंवा मायलेज कमी होते. मात्र, हे सर्व फक्त सामान्य लोकांमध्ये पसरवलेले गैरसमज असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. या अफवा आणि चुकीची माहिती नेमकी कोणाकडून पसरवली जाते, यावर गडकरी यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखती दरम्यान 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलविषयी उपस्थित झालेल्या शंकांना उत्तर देताना गडकरी यांनी स्पष्ट केले की, ई-20 इंधन (20टक्के इथेनॉलयुक्त पेट्रोल) वाहनांच्या इंजिनसाठी हानिकारक आहे किंवा ते धोकादायक ठरते, असा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. जगातील अनेक देशांमध्ये अशा प्रकारचे इंधन यशस्वीरीत्या वापरले जात असल्याचे त्यांनी सांगितले. गडकरींच्या म्हणण्यानुसार, एक विशिष्ट पेट्रोलियम लॉबी आहे जी खोटी माहिती पसरवून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहे.
भारताने जुलै 2024 मध्येच पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. प्रदूषण कमी करणे आणि आयात होणाऱ्या महागड्या कच्च्या तेलावरचा ताण कमी करणे, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. यामुळे शेतकरी तसेच देश, दोघांनाही फायदा होतो, असे गडकरी यांनी नमूद केले.