सध्या सोलापूरसह अन्य भागात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना रोखण्यासाठी सरकारकडून सातत्याने पावले उचलली जात आहेत. तरीही हे सायबर ठग नवनवीन क्लुप्त्या वापरून नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत.
सध्या हे बनावट कॉल्स इंटरनेटवर आधारित VoIP (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येत असून, अशा कॉल्सपासून सावध राहण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.
VoIP म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून होणारे कॉल. हे कॉल प्रामुख्याने +697 किंवा +698 अशा क्रमांकांनी सुरू होतात. या कॉल्समधून सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या कारणांनी लोकांकडून त्यांची वैयक्तिक व आर्थिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. थायलंडच्या टेलिकॉम विभागाच्या अहवालानुसार, असे कॉल्स विशेषतः लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येतात.
या कॉल्सचा मागोवा घेणे कठीण असल्यामुळे सायबर गुन्हेगार VPN चा वापर करून आपली ओळख लपवतात. ते स्वतःला बँकेचे कर्मचारी, सरकारी अधिकारी किंवा पोलिस असल्याचे सांगून तुमच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. ही एक मोठी फसवणुकीची साखळी असून नागरिकांनी वेळीच जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे.