मुंबई अन् पुण्यात आयफोन 17 खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. मुंबईच्या बीकेसी जिओ सेंटरमधील ॲपल स्टोअरबाहेर आयफोन 17 खरेदीसाठी झालेल्या गर्दीत आज गोंधळ उडाला. पहाटेपासून ग्राहकांची प्रचंड रांग लागली होती. परंतु नवीन फोन हातात लवकर मिळावा, यासाठी झालेल्या धक्काबुक्कीतून बाचाबाची आणि मारहाणीची वेळ आली.
परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांना तत्काळ हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी लोकांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारामुळे आयफोनसाठी असलेल्या प्रचंड क्रेझसोबतच त्यातून निर्माण होणारा ताणदेखील समोर आला.
ॲपलचा आयफोन 17 Pro Max ‘Cosmic Orange’ रंगाचा मॉडेल या गोंधळामागे कारण ठरला आहे. लाँच होताच या रंगाचा फोन भारतासह अमेरिकेत अवघ्या तीन दिवसांतच स्टॉक आऊट झाला. भारतातील अधिकृत ॲपल स्टोअरमध्येही सध्या हा रंग इन-स्टोअर पिकअपसाठी उपलब्ध नाही.
तज्ज्ञांच्या मते, हा रंग आयफोन 17 सीरिजमध्ये पहिल्यांदाच आणण्यात आला असून, त्याचा प्रीमियम मॅट फिनिश आणि युनिक लूक ग्राहकांना भुरळ घालत आहे.