तरुणांमध्ये आयफोनची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. आजपासून भारतात अॅपलची आयफोन 17 सीरिज विक्रीसाठी उपलब्ध आहे. नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी मध्यरात्रीपासून दिल्ली आणि मुंबईतील अॅपल स्टोअर्सबाहेर लोकांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
दिल्लीतील साकेत मॉलमध्ये सकाळपासूनच आयफोन खरेदीसाठी लांब रांगा लागल्या आहेत. आयफोन 17 सिरीज खरेदी करणारे पहिले व्यक्ती होण्यासाठी लोक उत्सुक आहेत. म्हणूनच काल रात्री उशिरापासून ग्राहक लांब रांगेत उभे आहेत.
‘मॉल ऑफ एशिया’मधील नुकत्याच सुरू झालेल्या ‘ॲपल हेबल’ स्टोअरसह प्रमुख ॲपल स्टोअर्समध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. या लाँचिंगमधील सर्वात मोठे आकर्षण ठरले ते ‘आयफोन 17 प्रो’ आणि ‘आयफोन 17 प्रो मॅक्स’चे कॉस्मिक ऑरेंज एडिशन. अनेकांनी या रंगाला ‘भगवा’ किंवा ‘केशरी’ रंग असे म्हटले आहे. ज्यामुळे या रंगाला केवळ त्याच्या आकर्षकतेमुळेच नाही, तर सांस्कृतिक महत्त्वांमुळेही अधिक पसंती मिळत आहे.
दरम्यान दिल्लीतील एका तरुणाने सांगितले, मी संगम विहारमधून आलो आहे आणि सकाळपासून रांगेत उभा आहे. मी खूप उत्साहित आहे, हा फोन हातात घेतल्यावर मला काहीतरी जिंकल्यासारखे वाटत आहे. कॉस्मिक ऑरेंज रंग खरंच खूप सुंदर आणि प्रभावी दिसतो. मी मुस्लीम असलो तरी मला हा रंग खूप आवडतो. तरुणाच्या या प्रतिक्रियेमुळे या ‘कॉस्मिक ऑरेंज’ रंगाचे आकर्षण विविध समुदायातील लोकांमध्ये असल्याचे दिसून आले आहे.
सोशल मीडियावरही आयफोनच्या या ऑरेंज रंगाची जोरदार चर्चा सुरु आहे. एका युजरने म्हटले की, एक भगवा आयफोन भारतात गेम चेंजर ठरू शकतो. याला मोठी मागणी मिळण्याची शक्यता आहे.